दंडात्मक आणि चौकशी सुरु असलेल्या कंपन्या अपात्र   

महापालिकेत कंत्राटी सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी २२ कंपन्या इच्छुक

पुणे : पुणे महापालिकेकडून मुख्य इमारतीसह इतर मालमत्तांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले जातात. हे सुरक्षा कंत्राटी असल्याने मुदत संपल्यानंतर नव्याने दरवर्षी निविदा प्रसिध्द केल्या जातात. यंदा पालिकेने दरवर्षी प्रमाणे एक वर्षासाठी नव्हे तर थेट तीन वर्षांसाठी निविदा प्रसिध्द केली आहे. कोट्यवधींची निविदा पदरात पाडून घेण्यासाठी राजकारण्यांनी मोठी फिल्डींग लावली आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी ज्या कंपन्यांवर गेल्या ५ वर्षात कोणत्याही स्वरुपाची दंडात्मक कारवाई झालेली आहे, त्या कंपन्यांना या निविदा प्रक्रियेतून अपात्र करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.
 
सुरक्षा रक्षकांची निविदा प्रसिध्द केल्यानंतर निविदेची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी पालिकेत काल बैठक पार पडली. या निविदा मिळविण्यासाठी २२ कंपन्यांनी पालिका प्रशासनाकडे इच्छा व्यक्त केली आहे. या २२ कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी लोकेशन म्हणजेचे ठिकाणांवर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले. तसेच निविदा या ५ ते ७ वर्षांसाठी काढण्यात याव्यात, पोलिसांकडून घेतल्या जाणार्‍या एनओसी बाबत तसेच एकूण कामगार कायद्यानुसार असलेल्या नियमांवर चर्चा झाली, असेही त्यांनी सांगितले. पालिकेकडून यापूर्वी ज्या कंपन्यांकडून सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट घेतले होती. त्यातील काही कंपन्यांनी कामगारांना वेतन उशीरा देणे, तसेच पालिकेचीच फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यावर पालिकेकडून आता काळजी घेतली जात आहे.
 
कंत्राटी सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी पालिकेने तब्बल १३९ कोटी ९२ लाख रुपयांची निविदा प्रशासनाने काढली असून ती मिळविण्यासाठी आता राजकीय फिल्डींग लावली जात आहे. पालकेला ६५० कंत्राटी सुरक्षा रक्षकांची कायम पदे मान्य आहेत. त्यापैकी केवळ ३५० सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे अपुर्‍या मनुष्यबळात सुरक्षा विभाग काम काम करत आहे.

Related Articles